मराठी विनोद – Marathi Vinod

ज्ञान ज्याचे त्याचे

सुशिक्षित आणि अशिक्षित लोकांमधील ज्ञानाचा फरक सांगताना चिं. वि. जोशी यांनी सांगितलेला हा एक किस्सा –

एक कृषी पदवीधर मुलगा आपल्या बापाच्या अज्ञानाला नावे ठेवीत म्हणाला, “बाबा, या झाडाला दहा वर्षांनी जरी जांभळं आली तरी मला आश्चर्य वाटेल.”

बाप म्हणाला, “दहा वर्षांनीच काय, पण या झाडाला उभ्या हयातीत जरी जांभळे आली तरी मला आश्चर्याचा धक्का बसेल!”

“का बरं?” मुलाने आश्चर्याने विचारले.

‘कारण हे जांभळाचं झाड नाही, आंब्याचं आहे!’ वडिलांनी स्पष्टीकरण दिले.

तो पुरुष कोण?

आपल्या कथेत विवाहित बायकांचे एक खास स्वभाव वैशिष्ट्ये सांगताना चिं. वि. जोशी म्हणतात,

“ऑफिसातून घरी आल्यावर बायको आपली विशेष काळजी करायला लागली की, आपल्या खजिन्यावर काहीतरी हुंडी आहे, असे ज्याच्या ध्यानात येत नाही तो पुरुष अगदी मतिमंद समजावा.”

निरोपाचे भाषण

स्पष्टपणे बोलण्याची शपथ घेतलेल्या चिमणरावांनी ऑफिसातील साहेबांच्या निरोप समारंभात केलेल्या भाषणातील हा काही भाग…

“हेडक्लार्क रा. अय्यंगर यांनी आमच्या पगारातून जबरदस्तीने एकेक रुपया वर्गणी कापून घेतली आहे. म्हणून आजचा हा प्रसंग साजरा होत आहे. आपल्या ऑफिसातील टर्नबूलसाहेब बदलून सिकंदराबादला जात आहेत, म्हणून झालेला आनंद व्यक्त करण्याकरिता आपण इथे जमलो आहोत. आम्हा कारकुनाची बारीकशी चूक नजरेस येताच ते आपल्या नावाप्रमाणे शिंगे रोखून अंगावर धावून येत असत. टर्नबूल यांच्यातील दोनच गुण आम्हाला आवडण्यासारखे होते. एक म्हणजे ते एक तास उशिरा कचेरीत येत आणि त्याची भरपाई करण्यासाठी एक तास आधी जात. दुसरे म्हणजे हजर असलेल्या चार तासांपैकी तीन तास ते झोप घेत असल्यामुळे आम्हाला फक्त एकच तास त्यांचा त्रास सहन करावा लागे!”

रम्य ते बालपण?

अनेक थोर लोक बालपणाचे गोडवे गातात. बालपण परत परत मागतात. अशा लोकांची टर उडविताना चिं. वि. जोशी बालसुलभपणाने लिहितात, “कशाला पाहिजे बालपण? एक पैसा खर्चायचीसुद्धा मोकळीक नसते. रोजचा अभ्यास केला नाही, तर आपल्या तिप्पट उंचीचा राक्षसरूपी मास्तर छडीने झोडपून काढतो. आपल्या खांद्याइतके उंच कुत्रे आपल्यावर येता-जाता गुरगुरते. आपले डोके ज्याच्या कंबरेपर्यंत पोहचते असा बाप ऊठसूट आपल्यावर खेकसत असतो. माळी आणि रखवालदार हात धुऊन आपल्या मागे लागलेले असतात. हे लहानपण पुढच्या जन्मी नशिबी न येता सरळ मोठेपण यावे, अशी जगन्माते चरणी प्रार्थना.’

न्याहारीचा उंदीर

विद्वान ही माणसे आपल्याच तंद्रीत असतात. अशा विद्वानांच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग चिं.वि.नीं रेखाटला आहे. वर्गात शिकवायला गेल्यावर आपली काय गडबड झाली हे सांगताना थोर विद्वान कृष्णानुजम म्हणतात, “रेडिएशनचा सजीवसृष्टीवर काय परिणाम होतो हे सांगण्याकरिता मी आज विद्यार्थ्यांना एक प्रयोग करून दाखवणार होतो. त्यासाठी मी एक चांगला गलेलठ्ठ काळा उंदीर प्रयोगशाळेतून मागवून माझ्या खिशात ठेवला होता. बेशुद्ध पडलेला हा उंदीर माझ्या खिशातून निसटून गायब झाला की, स्वतःला माझ्या न्याहारीचा ब्रेड समजून माझ्या उदरात गडप झाला ते मला कळत नाही.”

मोटार प्रवास!

चिमणराव आपल्या मोटारीतून ऑफिसला जात असत. या प्रवासाचा हा एक अनुभव, मी मोठ्या अभिमानाने सहकाऱ्यांना घेऊन ऑफिसला निघालो. कंपाऊंडात शिरलो; पण मोटार आज थांबण्याचे मनावर घेईना. काही केल्या इंजिन बंद होईना. पायब्रेक दाबला, हातब्रेक दाबला. गतिवर्धकावरचा पाय सैल केला, पण व्यर्थ! औटच्या फाटकातून बाहेर आणि इनच्या फाटकातून आत, असे करीत आम्ही गरगर फिरत होतो. ऑफिसच्या नोकराची आणि बघ्यांची पोर्चमध्ये गर्दी जमली. पेट्रोल संपले की गाडी थांबेल असा मला विश्वास होता; पण त्यासाठी तीन तास थांबावे लागले असते. अखेर दिल्लीच्या साहेबांची ‘ग्लोरियान ट्रेन’ आमच्या फाटकातून आत शिरताना माझ्या मोटारीने तिच्या पार्श्वभागावर धडक दिली आणि थांबली. या अपघातात माझ्या मोटारीचे नाक चांगलेच सडकले. माझ्या कपाळाला टेंगूळ आले, अय्यरसाहेबांचा चष्मा फुटला आणि त्या दोघा कारकुनांच्या हिरड्या सुजल्या.”

सालं की साली?

एकदा चिं. वि. जोशींच्या मुलाच्या हाताला लागलेलं डांबर काही केल्या निघेना, म्हणून तो म्हणाला, “हे डांबर सालं निघतच नाही!”

“बाळा, सालं, साला, साली असे शब्द आपल्यासारख्यांनी उच्चारू नयेत.” चिं. वि.नीं मुलाला समजावून सांगितल्यानंतर शांत झालेला मुलगा थोड्या वेळाने परत केळी खात-खात चिं. वि.कडे आला. हातातील केळी खाऊन झाल्यानंतर त्याने विचारले, ‘दादा, ही केळ्यांची काय आहेत?’ “सालं,”

“अहो, पण सालं, साला, साली म्हणायचं नसताना तुम्ही का म्हणालात?”

सायकललॉजी

चिं. वि. चांगल्या नोकरीच्या शोधात असताना आपल्याला किती माहिती असते, असे दाखविणाऱ्या एका विद्वानाने ते त्या जागेसाठी पात्र नसतानाही त्यांना एके ठिकाणी सायकॉलॉजीच्या शिक्षकाची गरज असल्याचे सांगितले. “मी त्या जागेसाठी खटपट करू का?” चिं. वि. नीं गमतीने त्यांना विचारले. “तुम्हाला सायकॉलॉजीवर नेमून घेण्याचा काय अधिकार आहे?” “नाही कसा? गेली १२ वर्षे मी सायकलवर निष्णात बसतो आहे, ते उगीच!” चिं. वि.नीं असे उत्तर दिल्यावर त्या विद्वानाचा चेहरा चक्क चौकोनी झाला.

स्वयंपाकीणबाईची तक्रार

आपण नव्याने ज्या घरी स्वयंपाकाचे काम नाइलाजाने स्वीकारले आहे, त्या घरातील पुरुष खूपच चोंबडा असल्याची तक्रार आपल्या शेजारणीकडे करताना ती काय म्हणाली,

“मेला खूपच चोंबडा आहे. आपल्या बायकोशी बोलताना माझ्याकडे बघून कोंबड्यासारखा कूक ऽऽ कूऽऽक करतो!”

“स्वयंपाकीणबाईला इंग्रजीत कूक म्हणतात, हे तिला काय माहीत?” चि. वि. जोशी यावर आपलं मत व्यक्त करतात.

स्टेशन कुठे बांधायचे?

रावसाहेब आपल्या तिसऱ्या कुटुंबासह नाशिक रोड स्थानकावर ऐटीत उभे होते. आपल्या शहाणपणाचा बायकोला रुबाब दाखविण्यासाठी ते धोंडू पोर्टरला म्हणाले, “शहरापासून पाच मैल अंतरावर स्टेशन बांधून रेल्वे कंपनीने काय साधले, ते मला कळत नाही.”

धोंडी नम्रपणे म्हणाला, “बरं साहेब, ठेसन लायनीवरचं बांधलं पाहिजे नव्हं का? त्याशिवाय गाड्या कशा ठेसनात येतील?”

मृत्यूलेखाचे रहस्य

वृत्तपत्रातील मृत्यूलेख कशा प्रकारचे असतात, याबद्दल टिळकांच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग चिं. वि. जोशींनी सांगितला आहे.

टिळक तेव्हा लोकमान्य पदाला पोहोचले नव्हते. एके ठिकाणी ते रात्रीच्या भोजनाला गेले असता तेथे छापखान्याचा निरोप्या घाईघाईने आला आणि टिळकांना म्हणाला, “बळवंतराव, आताच मुंबईहून ते हे मेल्याची तार आली आहे. हरिभाऊंनी सांगितलं

आहे, लवकर मृत्यूलेख लिहून द्या. अंक प्रेसवर खोळंबला आहे.”

टिळकांनी विचारले, “अरे गणोबा! कोण मेला आहे? त्याचे नाव सांगशील का नाही? त्याशिवाय काय लिहून देऊ?”

निरोप्या म्हणाला, ‘नाव तर मी विसरलो बुवा. पण तुम्ही मृत्यूलेख तर लिहून द्या. ते ते फार मनमिळाऊ होते, आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, वगैरे. आम्ही तार बघून नाव घालून टाकू!’

बुद्धिमत्ता पळाली

अगदी लहानपणी, म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षी घरात जाताना उंबऱ्यावर अडखळून पडल्यामुळे चिं. वि. जोशींच्या डोक्याला खोक पडली. केसांचा भांग पाडल्यासारखी ही खोक म्हणजे जोशींची जन्मखूण ठरली.

“महाराष्ट्रात बुद्धिमत्तेच्या जोरावर मी विद्वत्तेत नाव कमावले असते; पण डोक्याला खोक पडली आणि त्यातून सारी बुद्धिमत्ता पळाली…”

अशा प्रकारे जोशी आपल्या या जन्मखुणेला दोषी ठरवीत असले तरी त्यांच्या मित्रांचे मत मात्र निराळेच आहे. ते म्हणतात, “तुझा विनोद या फुटक्या डोक्याला साजेसाच आहे!”

हे काय पाहतो मी?

रंगभूमीवरील स्त्री-पुरुष संबंध कसे बदलले ते सांगताना चिं. वि. जोशी म्हणतात, एका नाटकात नायक आपल्या विद्यार्थिनीला शिकवीत असताना तिच्याशी लगट करतो. इतक्यात त्याची बायको येते, आणि ‘हाय हाय, हे मी काय पाहते आहे? असे विचारून बेशुद्ध पडते… असा प्रसंग होता. परंतु त्याकाळी लगट करतानाही नायक आणि त्याची विद्यार्थिनी यांच्यातील सहा फुटांचे अंतर कमी होत नसे. नायकाची बायको बेशुद्ध पडल्यावर तो सहा फूट अंतरावरुन तिला शुद्धीवर आणण्याची खटपट करीत असे.

“आता मात्र परिस्थिती खूप बदलली आहे. अगदी अलीकडे विद्याहरण पाहताना शुक्राचार्य तोंडाने बाळे बाळे म्हणत देवयानीला पुनः पुन्हा छातीशी घट्ट कवटाळीत होता. त्याचे कवटाळणे इतक्या थराला गेले की, प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्याला शुद्धीवर आणले.”

असत्य युग

मुलाला लाचेच्या आरोपाखाली शिक्षा झाल्यामुळे खाणावळ चालविण्याची पाळी आलेल्या चिं. वि. जोशींच्या कथेतील मावशीबाई सध्याच्या युगात बोकाळलेल्या खोटारडेपणाबद्दल संताप व्यक्त करताना म्हणतात,

‘नरो वा कुंजरो’ म्हटल्याबद्दल धर्मराजाचा एक अंगठा गळून पडला. तेव्हा कुठे त्याला स्वर्गात शिरायला मिळाले. आताच्या काळी दर एक खोटं बोलल्यागणिक एकेक बोट गळून पडायला लागलं, तर पोरगं बोलायला लागल्यावर पंधरा दिवसांच्या आतच त्याची वीसही बोटे महारोग्यासारखी गळून पडतील. काय चुनीलालशेठ, आधी तुम्हांला चमचाभर तूप वाढलं होतं तरी वाढलं नाही म्हणून का सांगता? जास्तं लागलं तर मागून घ्या, पण खोटं बोलू नका.’

“अरे पण, आजीबाई तुम्हीच म्हणाल्या ना इतक्यात की हे असत्य युग आहे म्हणून!” तुपाच्या चमच्याखाली आपली पोळी सरकवीत चुनीलालशेठ म्हणाले.

स्फूर्तिदायक भाषण

देशातील अन्न, वस्त्र आणि निवारा यांची टंचाई दूर करण्यासाठी केलेल्या एका भाषणात चिमणरावांनी सुचविलेले हे अफलातून उपाय…

“धान्य परिस्थिती बिकट असल्यामुळे प्रत्येकाने आठवड्यातून सात दिवस तरी उपवास करावा. कापडाची टंचाई दूर व्हावी म्हणून अठराव्या शतकातील मलबारी स्त्री-पुरुषांचे अनुकरण करा. घराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वांनी मोकळ्या मैदानावर आडोसा शोधण्याचा प्रयत्न करावा. त्याशिवाय आपला देश बळकट होणार नाही!”

नाकावर निबंध…

“उद्या नाकावर पाच पाच ओळी निबंध लिहून आणा,” असे मास्तरांनी सांगितले. नेमके कुणाच्या नाकावर लिहायचे हे मास्तरांनी न सांगितल्यामुळे मी मावशीच्या नाकाचा विचार केला. सकाळी ती झोपेतून उठायच्या आधी मी हातात कागद आणि पेन्सिल घेऊन तिच्याजवळ गेलो. तिच्या नाकावर कागद ठेवून पेन्सिलने निबंध लिहायला सुरुवात करणार इतक्यात तिला जोरात शिंक आली आणि कागद उडून गेला.

नाकावर निबंध लिहायचा आहे, ही माझी अडचण मी मावशीला सांगितली. तेव्हा तिने गाईच्या फताड्या नाकावर निबंध लिहिण्याचा सल्ला दिला. मी त्यानुसार प्रयत्न केला तेव्हा गाईलाही आपल्या नाकावर निबंध लिहिणे मान्य नसल्यामुळे तिने असा काही गोंधळ घातला की मला वडिलांच्या हातचा प्रसाद खावा लागला. नाकावर निबंध लिहून न आणल्यामुळे मास्तरांचा मार खावा लागला तो वेगळाच!

नाटकातील स्त्री

पूर्वी नाटकात पुरुष नटच स्त्रियांची कामे करायचे; पण बोलपटाचा जमाना आल्यावा बोलपटात बायकांची कामे बायका करायला लागल्या. याचा परिणाम रंगभूमीवा झाला. या काही वर्षांच्या काळात काही नाटक कंपन्यांनी स्त्रियांची कामे करायल स्त्रिया आणल्या, तर काही नाटक कंपन्या आपल्याकडे असलेल्या पुरुष पार्टीना सार्वजनिक ठिकाणीही स्त्री म्हणून सादर करू लागल्या होत्या. त्यामुळे समोर आलेली नटी खरी आहे की खोटी, याचा तपास कसा घ्यायचा, असा प्रसंग आपल्या एक कथेत निर्माण करून चिं. वि. जोशी सांगतात, “त्यानंतर जी नटी बाळासाहेबांच्य संपर्कात आली तिचे केस ओढून पाहिल्याशिवाय बाळासाहेबांनी तिच्याशी सलग केली नाही. “

“ह्या मेल्या खेडवळाला बायकांचे केस ओढायचा काय चाळा आहे काय की? नट्या म्हणवणाऱ्या बायका नंतर आपसात बोलत.

संदेश

एका कन्याशाळेत माझे व्याख्यान होते. व्याख्यानानंतर संदेश आणि स्वाक्षरी घेण्यासाठी सुमारे दीडशे मुली हातात वही आणि पेन घेऊन तयार होत्या. या सर्व मुलींच्या वह्यांवर संदेश लिहून स्वाक्षरी करायची म्हणजे मला दुपारचे जेवण रात्रीच करावे लागणार होते. यावर मार्ग काढण्यासाठी म्हणून व्याख्यानानंतर पहिल्याने स्वाक्षरी घेण्यासाठी आलेल्या मुलीच्या वहीवर मी संदेश लिहिला, “तुमचा एकूण बांधा पाहता, तुम्ही लवकर लग्न करा!”

माझा हा संदेश वाचताच बाकीच्या मुली संदेश आणि स्वाक्षरीसाठी रांग न लावता निघून गेल्या. त्यामुळे माझा दुपारच्या जेवणाचा मार्ग मोकळा झाला.

म्हैस आणि मोटार

आधीपासून घरी दुधासाठी म्हैस बाळगणाऱ्या चिमणरावांनी आपली प्रतिष्ठा ल सांभाळण्यासाठी मोटार घेतली. तेव्हा त्यांच्यासमोर निर्माण झालेला प्रश्न त्यांच्याच शब्दात, “मोटार दूध देत नाही आणि म्हैस माणसांना वाहून नेत नाही. मग ठेवायचं कुणाला म्हैशीला का मोटारीला?”